Agriculture Success Story: आजच्या धावपळीच्या युगात, लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना अनेकदा पाहायला मिळतात. रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या आणि अन्नपदार्थांच्या सेवनामुळे अनेक शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीत, खेड तालुक्यातील चिंबळी येथील जाधव दांपत्याने रानभाज्यांच्या शेतीतून नागरिकांना निरोगी, पौष्टिक आणि रासायनमुक्त अन्नपदार्थ पुरवण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या दांपत्याने आपल्या शेतीतून नागरिकांना रसायनमुक्त पालेभाज्या आणि फळभाज्या खायला देण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया.
पारंपारिक शेती सोडून रानभाज्यांचा प्रयोग
सीमा जाधव आणि चंद्रकांत जाधव हे खेड तालुक्यातील चिंबळी गावातील रहिवासी आहेत. सीमा जाधव यांच्या माहेरी शेती नसल्यामुळे त्यांना शेतीचे पूर्वज्ञान नव्हते. मात्र, पतीच्या सहकार्याने आणि आत्मविश्वासाच्या बळावर अवघ्या बारावी पास असलेल्या सीमाने पारंपरिक शेतीला फाटा देऊन रानभाज्यांच्या शेतीचा प्रयोग करण्याचे ठरवले. सुरुवातीला अडचणी आल्या, परंतु त्या निर्धाराने प्रयत्नशील राहिल्या.
‘शेतकरी ते ग्राहक’ अशी थेट विक्री
आज अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हे दांपत्य रानभाज्यांचा यशस्वी प्रयोग करत आहे आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवत आहे. रानभाज्यांची विक्री करताना त्यांनी “शेतकरी ते ग्राहक” अशी थेट विक्रीची योजना आखली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा थेट परतावा मिळतो. मधल्या व्यापाऱ्यांना वगळून, या पद्धतीने शेतकऱ्यांना जास्त नफा मिळतो. शहरी भागातील सोसायट्यांमध्ये रहाणाऱ्या नागरिकांना प्रामुख्याने हायब्रीड आणि रासायनिक अन्नाची सवय लागलेली असते. परंतु, जाधव दांपत्याने थेट सोसायट्यांमध्ये जाऊन रानभाज्यांची विक्री सुरू केली आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
त्यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग
त्यांच्या या उपक्रमात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग देखील समाविष्ट आहे. सध्या त्यांच्या शेतात करटुले या रानभाजीची लागवड करण्यात आली आहे. सीमा जाधव यांच्या वडिलांकडे शेती नव्हती, आणि त्यांनी शेतीशी संबंधित कोणतेही अवजार हातात घेतले नव्हते. सासरी आल्यावर, त्यांनी शेतीच्या विविध गोष्टी शिकल्या आणि मार्गदर्शन घेत रानभाज्यांच्या शेतीचा अभिनव प्रयोग राबवला. ब्रोकोली, करटोली, चायची भाजी यांसारख्या विविध प्रकारच्या रानभाज्या ते पिकवत आहेत.
पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने करतात शेती
गहू आणि बाजरीच्या पारंपरिक शेतीतून उदरनिर्वाह करणे अवघड जात असल्याने, त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन रानभाज्यांची शेती करण्याचा निर्णय घेतला. जाधव कुटुंबीय रासायनिक खते वापरण्याऐवजी पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. खताचे सर्व प्रकार ते स्वतःच तयार करतात आणि त्यामुळे त्यांच्या भाज्या पूर्णतः नैसर्गिक आणि आरोग्यवर्धक असतात.
पिंपरी चिंचवड शहर आणि आसपासच्या परिसरात या रानभाज्यांची विक्री करून, त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे रानभाज्यांना मोठी मागणी आहे, आणि वर्षाकाठी त्यांना सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यांच्या या शेती प्रयोगाची पंचक्रोशीत चांगली चर्चा आहे, आणि सीमा जाधव यांना या यशस्वी प्रयोगामुळे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सीमा जाधव यांचा युवा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
सीमा जाधव यांनी युवा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. आजच्या तरुण शेतकऱ्यांनी आपली जमीन विकण्यापेक्षा त्यात नवनवीन प्रयोग करावेत. शेतीतून भरघोस उत्पन्न मिळू शकते, असे त्या सांगतात. येणाऱ्या काळात शेतीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जमिनी आहेत, त्यांनी त्या न विकता त्यात उत्पादक शेती करावी, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
जाधव दांपत्याने आपल्या प्रयत्नांनी फक्त आर्थिक उत्पन्न नव्हे तर समाजातील अनेकांना निरोगी जीवनशैलीचा मार्ग दाखवला आहे. त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे आणि इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल. आपण सुद्धा जाधव दांपत्याकडून ही प्रेरणा घेऊन शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रयोग करू शकता, त्यातून आर्थिक प्रगती देखील साधता येऊ शकते.
हे पण वाचा » शेजारचा शेतकरी तुमचा बांध कोरतोय? मग ‘असा’ शिकवा त्याला कायदेशीर धडा; पुन्हा हिम्मत नाही करणार!
हे पण वाचा » ‘लाडकी बहीण’ प्रमाणे सरकारच्या ‘या’ 4 योजना सुद्धा देतात महिन्याला 1500/- रुपये; जाणून घ्या सविस्तर!