Airtel fixed deposit Marketplace: गुंतवणुकीकडे वाढलेला कल पाहता, आज अनेकजण सुरक्षित आणि जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांकडे वळू लागले आहेत. फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा अनेकांच्या मते अजूनही सर्वात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय आहे. दुसरीकडे, शेअर बाजारात जोखीम अधिक असल्यानं परताव्याची शाश्वती नसते, त्यामुळे काहीजण त्याकडे फारसे वळत नाहीत. या पार्श्वभूमीवर, भारती एअरटेल फायनान्सने एक नवा फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेस सुरू केला आहे, जो एअरटेल थँक्स अॅपवर उपलब्ध करून देण्यात अला आहे.
कमी रकमेपासून FD ची सुरुवात
एअरटेल थँक्स अॅपवर उपलब्ध असलेल्या या नवीन सुविधेमध्ये तुम्ही केवळ ₹1000 पासून फिक्स्ड डिपॉझिट सुरू करू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळं बँक खातं उघडण्याची आवश्यकता नाही. तुमचं विद्यमान बँक खातं वापरूनच तुम्ही गुंतवणूक करू शकता, त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. सध्या ही सेवा केवळ अँड्रॉईड डिव्हाइसवर उपलब्ध आहे, पण लवकरच iOS वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध होईल.
भागीदारी आणि आर्थिक संस्थांचा सहभाग
एअरटेल फायनान्सनं या सुविधेसाठी अनेक स्मॉल फायनान्स बँका आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांशी (NBFC) भागीदारी केली आहे. यामध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, शिवालिक बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि श्रीराम फायनान्स यांचा समावेश आहे. या बँका विविध आकर्षक व्याजदरांसह गुंतवणूकदारांना फिक्स्ड डिपॉझिट्स देतात, ज्यात ९.१% पर्यंत व्याजदर मिळू शकतो.
फिक्स्ड डिपॉझिटमधून पैसे काढण्याची सुविधा
एफडीचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार सात दिवसांनंतर कधीही पैसे काढू शकतात. ही सुविधा गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसोबतच फ्लेक्झिबिलिटी देखील देते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना गरजेच्या वेळेस पैसे सहज मिळू शकतात.
हे पण वाचा » मतदार यादीत स्वतःचे नाव कसे तपासायचे? जाणून घ्या ‘ही’ सोपी ऑनलाइन पद्धत!
कशी सुरू करू शकता FD?
- अॅप इन्स्टॉल करा: आपल्या अँड्रॉईड डिव्हाइसवर एअरटेल थँक्स अॅप इन्स्टॉल करा.
- मार्केटप्लेसला भेट द्या: अॅपमधील फिक्स्ड डिपॉझिट मार्केटप्लेसमध्ये विविध पर्यायांची तुलना करा आणि सर्वोत्तम व्याजदर निवडा.
- माहिती भरा: तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि KYC (नो योर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करा.
- रक्कम निवडा: ₹1000 किंवा त्याहून अधिक रक्कम निवडा आणि तुमच्या सध्याच्या बँक खात्यातून पैसे भरा.
- एफडी बनवा: एकदा गुंतवणूक झाल्यावर, तुम्ही एअरटेल थँक्स अॅपवरून तुमची एफडी सहज व्यवस्थापित करू शकता.
हे पण वाचा » एका कुटुंबातील किती लोकांना आयुष्मान कार्ड काढता येते? सरकारनं नुकताच ‘या’ नियमात केला बदल
सोपी आणि सुरक्षित गुंतवणूक
एअरटेल फायनान्सने आणलेल्या या नवीन सुविधेमुळे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणं अधिक सोपं झालं आहे. गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया, आणि कधीही पैसे काढण्याची सुविधा यामुळे हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरतो आहे. शिवाय, वेगळं बँक खातं उघडण्याची गरज नसल्यामुळे ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेणं आणखी सोपं झालं आहे.